Tuesday, October 13, 2015

उकल मनाची सांगावी कुणी ….

उकल मनाची सांगावी कुणी
लाट किनाऱ्याशी बांधावी कुणी
व्यसन वृथा हे आठवणींचे
धाव समयाची जिंकावी कुणी

शब्द जोडूनी साद मागतो
भाव विकुनी दाद मागतो
सलताना दरवळते जी
ती कट्यारी याद मागतो
शब्दांमधल्या रित्या जागेची
कस्तुरी कधी पांघरावी कुणी
 
उकल मनाची सांगावी कुणी ….

तो वृक्ष उभा सांगत आहे
ग्रीष्म फांदीवर नांदत आहे
लाट सोनेरी रापताना
छाया कोवळी रांगत आहे
मेघ जुने सावळ्या ऋतूंचे
आणुनी वर्षा शिंपडावी कुणी

उकल मनाची सांगावी कुणी ….


Saturday, September 12, 2015

ती ....

ती
कंचुकी नयना
कट्यारी दैना
करे जी गय ना
सावजाची

ती
कोवळ नाजूक
नजरी चाबूक
लागे आपसूक
वार मधुवंती

ती
चाल करी बेहाल
मदिरा जंजाल
मयाची मिसाल
भूतलावरती

ती
गझल रुख्सार
अमृती खयाल
सुरीला सवाल
उकल ना ज्याची

ती
डोळ्यात विरघळे
स्वप्न सावळे
जे ना मावळे
तमाच्या तिरी

ती
सुंदर उदास
हासत विराण
कैद उडाण
करे विहंगाची