नंतर ती परत भेटलीच नाही
खूप शोधलं तिला
गवाक्षा काठी
कानाकोपऱ्यात
बंद केलेल्या
हरेक कप्प्यात
खूप आत गाभाऱ्यात
धूसरशा आरश्यात
खूप अडगळ मिळाली
पण जंग जंग पछाडूनही
मनात कुठेही ती सापडलीच नाही
तिने उमटविलेल्या खुणाही
विरळ झाल्यात आता
हो.. कधी कधी
अडगळीतून तिच्या आठवांचे
ऐवज डोकावतात .. खुणावतात
पण स्पर्शत नाहीत बोलत नाहीत
फक्त उसासे देऊन जातात
जिगीषा मेली नसेल अजूनही
तिचे श्वास ऐकू येतायत मला
शोधीन मी तिला परत..